Sunday, October 2, 2011

'गांधी मला भेटला' या कवितेसंबंधीची बातमी

कवितेसंबंधीचा खटला सर्वोच्च न्यायालयात जाऊन संपला आहे, त्यासंबंधीची अधिक माहिती नोंदीच्या खाली दिली आहे. मूळ नोंद जुनी असल्यामुळं सुरुवातीला उच्च न्यायालयातील बातमी दिसेल.
---
 
गुर्जरांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेवर बराच वाद झाला. काही लोकांना ती अश्लील आणि विचित्र वाटली, ते मग न्यायालयात गेले. २०१०च्या २४ जानेवारीला 'लोकसत्ता'च्या 'मराठवाडा वृत्तान्त' या पुरवणीत छापून आलेली ही बातमी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या कवितेसंबंधीच्या खटल्यात जो निकाल दिला त्याची- 
***

‘गांधी मला भेटला’ कविता बीभत्स आणि अनुचित
- उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मराठवाडा वृत्तान्त
औरंगाबाद, २४ जानेवारी/खास प्रतिनिधी
मुंबईचे कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला’ या कवितेतील अनेक ओळी सभ्यतेला धरून नाही. परंतु त्या ओळी अश्लील, बीभत्स आणि अनुचित अशाच आहेत असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. पोतदार यांनी दिला आहे. या कवितेतील ओळींमुळे महात्मा गांधी यांची प्रतिष्ठा व प्रतिमा डागाळली आहे, असे मतही न्यायालयाने आपल्या निकालात व्यक्त केले आहे.

वसंत गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्ट १९९४ मध्ये प्रसिद्ध झाली. या गृहपत्रिकेचे प्रकाशक देवीदास तुळजापूरकर तर मुद्रक धनंजय दादासाहेब कुलकर्णी हे आहेत. हे द्वैमासिक या संघटनेच्या सदस्यांना खासगीरित्या वितरित केले जाते.

पतित पावन संघटनेचे व्ही. बी. अनासकर यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अर्ज दिला. महात्मा गांधी यांची प्रतिमा पितामह आहे. ही प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न ‘गांधी मला भेटला’ या कवितेतून झाला आहे. ही कविता अश्लील आणि बीभत्स अशी आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण लातूरकडे वर्ग केले. लातूरच्या पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान १५३ (अ) (ब) आणि २९२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर लातूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. लातूरच्या न्यायालयाने ४ मे २००१ ला देवीदास तुळजापूर, वसंत गुर्जर आणि धनंजय कुलकर्णी यांना भारतीय दंड विधान २९२ (२) नुसार दोषी ठरविले. समाजात तेढ निर्माण करण्याच्या गुन्ह्य़ातून या तिघांना मुक्त करण्यात आले मात्र अश्लीलतेचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या तिघांनी लातूरच्या जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला. तोही अमान्य करण्यात आला. त्यामुळे देवीदास तुळजापूरकर यांनी २००२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लातूर न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात फौजदारी अर्ज केला.  ही कविता सभ्येतला धरून नसेल कदाचित पण बीभत्स नाही असे देवीदास तुळजापूरकर यांचे ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले. वसंत गुर्जर या कवीने शुद्ध, टीकात्मक आणि उपहासात्मक ही कविता केली आहे. द्वैमासिकात प्रसिद्ध करण्यात आलेली ही कविता बँकेतील उच्च विद्याभूषित कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. या कवितेचे स्वागत अनेक मान्यवरांनी केले आहे. जनसामान्य वाचकांच्या भावना दुखावत नाहीत असेही विनायक दीक्षित यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले. बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयातील तीन दाखले सादर केले. पण हे दाखले या प्रकरणांना लागू होत नाहीत. दाखल्यांमध्ये बचाव पक्षाला त्यांच्या बचावासाठी संधी देण्यात आलेली होती. या प्रकरणात तसे झालेले नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

जनसामान्यांच्या दृष्टीने आदर्शवत नैतिकता असलेल्या भारतात महात्मा गांधी यांची प्रतिमा राष्ट्राचे पितामह अशी आहे. त्यांना मानाचे स्थान आहे. महात्मा गांधी हे संत आणि धार्मिक वृत्तीचे आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यासाठी महात्मा गांधी ओळखले जातात. या कवितेत कवीने महात्मा गांधी हे कवीला भेटतात अशी कल्पना करून सध्याच्या समाजातील सद्यस्थितीवर टीका करतात. असभ्य, अनुचित असे शब्द महात्मा गांधी यांच्या तोंडी घालण्यात आले आहेत. ही कविता सभ्येतला धरून नाही. ती बीभत्स, अश्लील, अनुचित अशीच आहे असा निर्वाळा न्या. पोतदार यांनी आपल्या निकालात दिला आहे. उपरोधिकपणे गांधीजींचे विचार या कवितेत मांडले आहेत असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. उच्च विद्याविभूषितांनी केलेले हे भाष्य आहे. जनसामान्यांनी केलेले भाष्य नव्हे असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे हा युक्तिवाद मान्य करता येत नाही. या कवितेतील काही ओळी महात्मा गांधी यांची प्रतिमा व प्रतिष्ठा डागाळणारी आहे, असेही भाष्य न्यायालयाने केले आहे. कवितेतील अश्लीलतेचा आरोप कायम ठेवण्यात आला आहे. कवी वसंत गुर्जर, मुद्रक धनंजय कुलकर्णी आणि प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांनी लातूरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे येत्या तीन आठवडय़ांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन न केल्यास या तिघांवरही योग्य ती कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे सांगून न्यायालयाने देवीदास तुळजापूरकर यांचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित, अ‍ॅड्. एस. पी. कात्नेश्वरकर, राज्य शासनातर्फे अ‍ॅड्. एन. बी. पाटील आणि वसंत गुर्जर व धनंजय कुलकर्णी यांच्यातर्फे प्रशांत कुलकर्णी यांनी काम पाहिले.  
-----------

-------
 
१४ मे २०१५ रोजी या नोंदीत घातलेली भर-
 
या कवितेसंबंधीचा खटला अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन संपला आहे. कवितेचे प्रकाशक देविदास तुळजापूरकर यांनी न्यायालासमोर माफी मागितल्यानंतर कवितेवरची बंदी कायम ठेवत न्यायालयाने या खटल्याचा शेवट केला. यासंबंधी 'महाराष्ट्र टाइम्स' या वर्तमानपत्रात आलेली बातमी अशी:
 

'गांधी मला भेटला' खटला मिटला

'गांधी मला भेटला' या कवितेचा खटला अखेर प्रकाशकांनी माफी मागितल्याने मिटला. चौकटीबाहेर जाऊन महापुरूषांचा अपमान झाला. व्यक्तीस्वातंत्र्य आहे मात्र महापुरूषांचा अपमान नको, असं सुप्रीम कोर्टाने प्रकाशकांना सुनावलं आणि प्रकाशकांना माफी मागण्याचे आदेश दिले.

कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला...' या कवितेतील ओळी सभ्यतेला धरून नसल्याच्या मुंबई हायकोर्टाने नमूद केलं होतं. त्यानंतर हा खटला सुप्रीम कोर्टात गेला होता. गुर्जर आणि कविता प्रसिद्ध करणाऱ्यांविरोधात पतित पावन संघटनेने याचिका दाखल करून राष्ट्रपिता असलेल्या गांधीजींचा अपमान झाल्याचा, आरोप करण्यात आला. गुर्जर यांनी १९८४ मध्ये ही कविता लिहिली, तर १९९४ मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या जुलै-ऑगस्टच्या द्वैमासिकात ती प्रसिद्ध झाली होती. पतित पावन संघटनेने महात्मा गांधी यांची प्रतिमा पितामह अशी आहे. ही प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न 'गांधी मला भेटला' या कवितेतून झाला आहे. ही कविता अश्लील आणि बीभत्स अशी आहे, असे म्हणत याविरोधात तक्रार केली होती. समाजात तेढ पसरवण्याच्या आरोपातून प्रकाशक आणि कवीला मुक्त करण्यात आले. मात्र, अश्लीलता, असभ्यतेच्या आरोपातून मुक्त करण्यास सेशन्स आणि हायकोर्टानेही नकार दिला होता. या निर्णयाला प्रकाशकाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

गांधी त्यांना कळलाच नाही!

मी कवितेत जे काही म्हटलेय ते गांधींसंदर्भात नाही, तर गांधींच्या पश्चात सगळ्याच पातळ्यांवर भारताचं जे अवमूल्यन झालेय, त्यावर टीका करणारी ही कविता आहे. गांधींच्या पश्चात माजलेली ही अराजकता असल्यामुळेच, ही कविता ज्या पोस्टरवर छापून आली होती, त्या पोस्टरवर गांधीजींचे पाठमोरे रेखाचित्र छापण्यात आले होते. पण कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणा‍ऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे. - वसंत गुर्जर

***
 
१५ मे २०१५ रोजी महाराष्ट्र टाइम्समधे प्रसिद्ध झालेली आणखी सुधारित बातमी-
 

कवीच्या खांद्यावर खटला कायम!


 
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेवरील खटल्यातून सुप्रीम कोर्टाने ही कविता प्रसिद्ध करणारे 'बुलेटिन' या द्वैमासिकाचे प्रकाशक-संपादकद्वय धनंजय कुलकर्णी व देवीदास तुळजापूरकर यांना विनाशर्त मुक्त केले आहे. या दोघांनी याबद्दल २० वर्षांपूर्वी माफी मागितल्याने सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. मात्र, या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवीवरच आहे, असे सांगून हा खटला लातूर सेशन्स कोर्टाकडे वर्ग केला.

कवितेत काय?

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांनी या कवितेत सामाजिक, राजकीय स्थितीवर विडंबनात्मक भाष्य केले आहे. स्वतः वसंत गुर्जर यांनी, 'मी कवितेत जे काही म्हटलेय ते गांधींसंदर्भात नाही, तर गांधींच्या पश्चात सगळ्याच पातळ्यांवर भारताचं जे अवमूल्यन झालेय, त्यावर आहे', अशी भूमिका मांडलेली आहे.

सुप्रीम कोर्ट म्हणाले...

या कवितेबाबत सुप्रीम कोर्टाने गुरुवारी टिप्पणी करताना, 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य यांनाही सभ्यतेची चौकट लागू आहे. गांधीजींसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात असभ्य भाषेचा वापर कुणालाही करता येणार नाही', असे म्हटले आहे. 'या कवितेतील भाषिक स्वातंत्र्याचा मुद्दा काळजी करावा, असा आहे. महात्मा गांधींसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महान अशा व्यक्तित्वाच्या संदर्भात असभ्य भाषेचा वापर कुणालाही करता येणार नाही', असेही कोर्टाने नमूद केले आहे.

आधीच्या माफीमुळे प्रकाशक सुटले

साहित्यवर्तुळात प्रचंड चर्चा झालेल्या 'गांधी मला भेटला' कवितेबाबत प्रकाशकांनी आधीच माफी मागितली असल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांची मुक्तता केली. सन १९८४ मध्ये 'प्रास प्रकाशन'ने छापलेल्या 'गांधी मला भेटला' या पोस्टर पोएट्रीची साहित्यवर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती. ही कविता त्यानंतर दहा वर्षांनी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियनच्या 'बुलेटिन' या मुखपत्रात कुलकर्णी व तुळजापूरकर यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा प्रसिद्ध केली. मात्र त्यानंतरच्या 'बुलेटिन'च्या पुढच्याच अंकात त्यांनी, 'गांधीजींबद्दल आमच्या मनात आदराचीच भावना असून या कवितेने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो', अशी स्वच्छ शब्दांत दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु, त्यानंतर दोन महिन्यांनी जानेवारी १९९५ मध्ये पतित पावन संघटनेने, राष्ट्रपित्याची बदनामी केल्याचा आरोप ठेवून कवी, संपादक व प्रकाशक यांच्यावर कलम १५३ अ, १५३ ब व २९२ (३) अन्वये गुन्हा दाखल केला होता. यातील २९२ (३) हे असभ्यता आणि अश्लीलतेचे कलम तसेच ठेवून लातूर सेशन्स कोर्टाने राजद्रोह व राजकीय अस्थिरता आणि वैमनस्य निर्माण करण्याचा आरोप असलेली उर्वरित दोन कलमे रद्द केली होती. उरलेले कलमही काढण्यात यावे, याकरिता संपादक-प्रकाशकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळत, कवितेतील ओळी असभ्य असल्याचा शेरा नोंदवला होता. याविरोधात प्रकाशकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. गेले तीन महिने सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती दीपक मिश्रा व प्रफुल्ल पंत यांच्यापुढे चालेल्या खटल्यात प्रकाशकांच्या बाजूने अॅड. गोपाल सुब्रमण्यम यांनी तर अॅमॅकस क्युरी म्हणून फली नरिमन यांनी काम पाहिले. अॅड. गोपाल सुब्रमण्यम यांनी केलेल्या ११ तासांच्या जोरदार प्रतिवादानंतर कोर्टाने गुरुवारी १४५पानांचे निकालपत्र दिले. त्यात असे म्हटले आहे की, हा खटला २० वर्षे इतका प्रदीर्घ काळ चाललेला आहे आणि प्रकाशकांनी ही कविता छापल्याबद्दल यापूर्वीच माफी मागितलेली आहे. त्यामुळे त्यांना यातून मुक्त करण्यात येत आहे. मात्र कवितेचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी खुद्द कवीवरच आहे.
 

***
यासंबंधी अधिक काही-

No comments:

Post a Comment